काँग्रेस नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचा मुलगा डॉ. सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या कदाचित त्यांच्या पक्षासाठी दबावतंत्राचा भाग असावा. भाजपशी त्यांचा कोणताही संपर्क नाही किंवा भाजपचा कोणताही नेता त्यांच्या संपर्कात नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली असली तरी जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. आघाडीमध्ये नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असून, या मतदारसंघातून यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे हे इच्छुक आहेत. पण ही जागा काँग्रेसला सोडण्यास राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून विशेषत: अजित पवार यांचा विरोध होत आहे. ही जागा काँग्रेसला न मिळाल्यास विखे पिता-पुत्र काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मंगळवारी सकाळी खा.दानवे यांनी औरंगाबादहून पुण्याकडे जाताना अहमदनगर येथे खा.दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी तासभर थांबून गांधी यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना खा. दानवे म्हणाले, विखेंचा अद्याप भाजपशी संपर्क झालेला नाही. यासंबंधीच्या ज्या बातम्या येत आहेत, त्यावरून ते काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर त्यांचे उमेदवारीसाठीचे दबाव तंत्र असल्याचे वाटते. एकूणच सर्वच पक्षांवर ते उमेदवारीसाठी दबाव आणत असल्याचे दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. विखे पिता-पुत्रांचा भाजप प्रवेश ही केवळ चर्चा आहे. भाजपकडून त्यासंबंधी काहीही हालचाली नाहीत. भाजपची कोणतीही उमेदवारी यादी निश्चित झालेली नसल्याचीही माहिती दानवे यांनी दिली.